Pune District : महिलांच्या उत्पादित वस्तुंसाठी पुण्यश्री सुपर मार्केट

सासवड : राज्यात सर्वत्र महिला बचत गट चळवळ अधिक कार्यक्षमतेने सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यश्री सुपर मार्केट योजना राबविण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावच्या सरगम महिला बचत गटाच्या या उपक्रमाचे नुकतेच सासवड येथे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नती अभियान अर्थात (एमएसआरएलएम) अंतर्गत या योजनेचे जिल्हा अभियानाच्या सहसंचालक व जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास पुरंदरचे गटविकास अधिकारी पंकज शेळके प्रमुख उपस्थित होते. यावेळी बचत गटाला दोन लाख रुपये धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुरंदरमधील अशा स्वरुपातील हा पहिलाच प्रयोग असून महिलांनी उत्पादीत केलेल्या सर्व वस्तूंना एकाच ठिकाणी वस्तू विक्रीची उपलब्धता होणार असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कुर्डे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील चारही पंचायत समिती गणातील समन्वयक गणेश किकले, सागर ढाकणे, महंतवीर घाडगे, रमेश भंडलकर यांसह सरगम महिला बचत गट, क्रांतीज्योती महिला ग्रामसंघ, सावित्रीज्योति महिला प्रभागसंघ, गटातील सर्व सीआरपी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





