पुणे जिल्हा : वर्षाविहाराला प्रतिबंध

जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये जिल्हाधिकार्यांकडून 31 जुलैपर्यंत पर्यटनास मनाई
पुणे –जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा या तालुक्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे आदी ठिकाणी पर्यटनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच जिल्ह्यात ताम्हिणी आणि भुशी डॅम परिसरात दोन घटनांमध्ये एकूण सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दि. 31 जुलै 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या तालुक्यातील पर्यटनठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहणार आहे.
वेगाने वाहणार्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहण्यास बंदी, धबधबे, दर्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदी, नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान व मद्यधुंद अवस्थेत करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते व वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. तसेच रात्रीच्या वेळी पर्यटन स्थळांची माहिती नसल्याने पर्यटक भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी येणार्या नागरीकांची सुरक्षा अबाधित रहावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये वर्षाविहार, पर्यटन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
याठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू
* मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉइंट, लॉयन्स पॉइंट, राजमाची पॉइंट खंडाळा, सहारा ब्रिज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर
* मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा.
* हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर
* आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा
* जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह
* भोर तालुक्यातील भाटघर धरणे व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे
* वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा.
* खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर
*इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटींग क्षेत्र.





