Pune District : नाझरे धरण तुडुंब..250 क्युसेकने जलाशयाच्या सांडव्यावरून : ग्रामस्थांकडून जलपूजन

जेजुरी – उत्तर पूर्व पुरंदर आणि उत्तर पश्चिम बारामती तालुक्याची जीवनवाहिनी समजले जाणारे आणि 788दशलक्षघनफुट पाणी साठवण क्षमता असलेला क-हा नदीवरील नाझरे (मल्हार सागर )जलाशय 100टक्के भरला असून 1994 सालानंतर प्रथमच जून महिन्यात जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. सुमारे 250 क्युसेकने जलाशयाच्या सांडव्यावरून विसर्ग होत असल्याची माहिती नाझरे पाटबंधारे शाखा अभियंता अनिल घोडके, वरिष्ठ कर्मचारी विश्वास पवार यांनी दिली.
आषाढ मासाच्या प्रथम दिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.26) जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी वर्गाच्या वतीने पापनाश तीर्थ (रंभाई शिंपींन कट्टा)येथे वाजत गाजत जाऊन विधिवत पूजन, क-हामाईला साडी चोळी अर्पण करीत भंडारा-फुलांची उधळण केली तसेच महाआरती घेण्यात आली. यावेळी प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिव छबन कुदळे, संजय खोमणे, हनुमंत खोमणे पाटील, रामदास माळवदकर, रोहिदास माळवदकर पाटील, पुजारी गणेश आगलावे, महेश आगलावे,
विठ्ठल सोनवणे, सतीश घाडगे, काशिनाथ मोरे, सचिन कदम, दीपक राऊत, सुशील राऊत, भारत शेरे, कृष्णा कुदळे, माजी विश्वस्त नितीन राऊत, सुधीर गोडसे, शिवराज झगडे, संदीप जगताप, नगरपालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, कर्मचारी अधिकारी वर्ग आदींसह ग्रामस्थ, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त मंगेश घोणे यांनीही सपत्नीक जलपूजन केले. पुजारी प्रसाद खाडे, गोविंद बेलसरे, शेखर सेवेकरी यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले.
पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा -ग्रामस्थांची मागणी
कितीतरी वर्षातून आषाढ मास सुरू होण्यापूर्वी नाझरे जलाशय पूर्णपणे भरला आहे ,मात्र ,नगरपालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आणू नये अशी मागणी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी इंगुले यांचेकडे करण्यात आली.





