Pune District : जवळार्जुनमध्ये शासकीय निधीचा अपहार

ग्रामपंचायतीत बनावट दस्तऐवज : फौजदारी गुन्हे दाखल करा
जेजुरी – जवळार्जुन ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविकेने खोटे दस्ताऐवज तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप करीत भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावीत, अशी मागणी माजी सरपंच व विद्यमान सदस्य सोमनाथ कणसे यांनी केली. याबाबत लेखी तक्रारी त्यांनी पुरंदरच्या गटविकास अधिकारी आणि जेजुरी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत.
जवळार्जुन ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती कणसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. कणसे हे १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच झाल्यानंतर (दि.२८) फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत गावातील तीन अंगणवाडीच्या परसबागेच्या तारेच्या संरक्षक भिंतीचे काम करून घेण्याचा ठराव झाला होता. मात्र, याबाबत प्रक्रिया राबवली नव्हती. मात्र, अचानक तत्कालीन ग्रामसेवक महेंद्र लोणकर यांनी दि. २८ सप्टेंबर २०२१ च्या मासीक सभेत काम पूर्ण झाले असून त्याचे बिल अदा करावे म्हणून धनादेश सादर केला. तत्कालीन सरपंच कणसे यांनी
कामाचे बिल ५० हजारांपेक्षा जास्त असल्याने कामासाठी दिलेली वर्क ऑर्डर, काढलेल्या निविदा, टेंडर अशी प्रक्रिया केलली दिसत नाही. त्यामुळे हे बिल अदा करण्यास सरपंच कणसे यांनी नकार दिला. याच बिलावरून ग्रामपंचायतीत वाद निर्माण झाला. कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच कणसे हे कमिशन मागतात. अशी बदनामी केली. ठेकदाराने आत्महत्या करण्याची धमकी दिली. सोमनाथ कणसे यांना ४ जानेवारी २०२५ रोजी सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले.
सरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर अजिंक्य टेकवडे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मार्चच्या मासिक सभेत बिल अदा केले आहे. यात पुरवठादार भगवती स्टील यांच्या नावाने ५५०१७ रुपये, मजुरी म्हणून प्रमोद राणे यांच्या नावाने २४९०० रुपयांचे धनादेश दिले आहेत. धनादेशावर सरपंच टेकवडे आणि ग्रामसेवक रुपाली लोणकर यांच्या सह्या आहेत. शासकीय नियम न अवलंबता हे बिल अदा केले आहे. हा सर्वसामान्यांच्या तसेच शासकीय निधीचा अपहार असून याची चौकशी होऊन संबंधितांवर फोजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी कणसे यांनी केली आहे.
उपसरपंच प्रतिभा राणे यांचे बिलाची मागणी करणारे प्रमोद राणे नातेवाईक असल्याने त्यांच्याकडून माझ्यावर सतत दबाव येत होता. म्हणून सलग तीन वेळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुरंदर गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे बिलाबाबत मार्गदर्शन मागवले होते. आजपर्यंत त्यांच्याकडून मला मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
महिन्यांपूर्वी गटविकास अधिकारी आणि जेजुरी पोलीस ठाण्यात चौकशी होऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अजूनही कारवाई झाली नाही. विद्यमान सरपंच माजी आमदाराचे चिरंजीव आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणावर दबाव असावा म्हणून चौकशी लांबत असल्याचा आरोप माजी सरपंच सोमनाथ कणसे यांनी केला आहे.
बिल अदा कारण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक महेंद्र लोणकर यांनी आपणाला कायदेशीर प्रक्रिया राबवल्याची माहिती दिली. त्यासाठी वर्क ऑर्डर, टेंडर दिल्याची पत्रेही दिल्यामुळे बिल अदा केल्याचे ग्रामसेविका रुपाली लोणकर यांनी सांगितले.
राजकीय भांडवल करून बदनाम करण्याचा कट
सरपंच अजिंक्य टेकवडे म्हणाले, जवळार्जुन येथे अंगणवाडी परसबाग संरक्षक भिंतीमध्ये अपहार झाला हा माजी सरपंच सोमनाथ कणसे यांनी केलेला आरोप निलाखस खोटा व तथ्यहीन आहे. केवळ राजकीय भांडवल करून बदनाम करण्याचा डाव आहे. वास्तविक या कामाची टेंडर निविदा प्रक्रिया करून काम झाल्यानंतर बिल अदा केले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.





