Pune District : कनेरसर-पाबळ रस्ता खड्ड्यांत

अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना आमंत्रण : टाव्हरे यांच्यकडून निवेदन सादर
दावडी – कनेरसर येथील श्री यमाई मंदिर (पाबळ ता. शिरूर) येथील जैन मंदिर, कनेरसर येथील सेझ क्षेत्रातील कंपन्या यामुळे कनेरसर-पाबळ रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. रस्त्याची रूंदी कमी, साईडपट्ट्या उखडल्या आहे. त्यात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने खड्ड्यत रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनचालक व नागरिकांना निर्माण झाला आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी पुणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम(उत्तर)पुणे, उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम,खेड यांना निवेदने दिली. तसेच कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांची भेट घेऊन रस्त्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली.
यावेळी शाखा अभियंता खेड नितीन दाने, अभिजित शिंदे,संतोष लोहोकरे उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले होते; परंतु ते निकृष्ट असल्याने वर्षातच रस्ता उखडला होता, तात्पुरती डागडुजी केली जात आहे. सध्या तातडीने साइडपट्ट्या व खड्डे भरून घेण्याचे आदेश द्यावेत. कनेरसर परिसरात सेझ क्षेत्रात अमुल, जेएसडब्ल्यु, मिंडा सारख्या अनेक नामवंत कंपन्यांचे प्रकल्प आहे. गेल्या तीन वर्षांत कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने कनेरसर-पाबळ रस्त्यावर वाहतुक पाच पटीने वाढली आहे.
तरी तातडीने गोगावले वस्ती, कनेरसर ते पाबळ (राज्यमार्ग क्र.103)या सहा कि.मी.साठी शासनाने निधी द्यावा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निधीतून तातडीने रस्त्याचे खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी व निधी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे.





