Pune District : शिक्षक संघाच्या राज्य अध्यक्षपदी बाळासाहेब मारणे यांची निवड

टाकळी हाजी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्ष पदी बारामती पुणे येथील बाळासाहेब मारणे यांची निवड करण्यात आली. शिक्षक संघाच्या गोंदवले येथे झालेल्या महामंडळ सभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत या निवडीची घोषणा करण्यात आली, संघटनेच्या स्थापनेपासून प्रथमच पुणे जिल्ह्याला संधी मिळाल्याने शिक्षकांकडून मोठा आनंदोत्सव सुरू असल्याची माहिती कोषाध्यक्ष माऊली पुंडे बापूसाहेब लांडगे,संतोष शेवाळे यांनी दिली.शिरूर चे कार्यकर्त्यांनी अक्षरशः मारणे यांना डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली.
प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रातिनिधिक संघटना आहे. राज्यभरात दोन लाखाहून अधिक शिक्षकांचे पाठबळ या संघटनेस आहे, कोल्हापूर, सांगली सातारा, सोलापूर पुणे यांसह राज्यभरातील बहुतांश शिक्षक बँका व पतसंस्था यांवर शिक्षक संघाचे वर्चस्व आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी महामंडळ सभेमध्ये करण्यात आल्या.
यावेळी ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या हस्ते महामंडळाचे उदघाटन करण्यात आले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, घरभाडे भत्ता यांसह ग्राम विकास विभागाकडील सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी मुख्यालय राहण्याचा प्रश्न तसेच शिक्षक बदल्या, जुनी पेन्शन, वेतन आयोगाच्या त्रुटी यांसह १० २० ३० आश्वासित प्रगती योजना, कॅशलेस विमा या सर्वच महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची विनंती ग्रामविकास मंत्र्यांना केली महामंडळ सभेत राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे (पुणे), कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले (कोल्हापूर), कार्याध्यक्ष संतोष कदम (रत्नागिरी) व किशन ईदगे (परभणी), कोषाध्यक्ष हंबीरराव पवार (सांगली), सरचिटणीस कैलास दहातोंडे (बीड) यांच्यासह महापालिका कार्यकारी अध्यक्षपदी सचिन डिंबळे, केंद्रप्रमुख अध्यक्षपदी राजेंद्र जगताप, राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी राजेश काळभोर, आप्पासाहेब कुल यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील व विशेषतः शिरूर तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते, विभागीय अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे, उत्तमराव भंडारे, सोमनाथ गायकवाड, प्रवीण गायकवाड, शिरूर तालुकाध्यक्ष संतोष गावडे,नेते संतोष शेवाळे, आप्पासाहेब रसाळ, राज्य संघ, जिल्हा संघ व तालुका संघाचे प्रमुख पदाधिकारीव शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांसाठी ग्रामविकासमंत्र्यांची वकिली
राज्यातील शिक्षकांची बाजू मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यासाठी वकिली करणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलीराज्यभरात गुणवत्तापूर्ण शिक्षणात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत, शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी राज्य संघाची आग्रही भूमिका राहील, शिक्षक संघाच्या शाखा व उपशाखा यांना बळ देण्यात येईल, आगामी काळात संघटनेत युवकांना प्राधान्य राहील
– बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ





