Pune District : रुई येथील बाबीर देवाच्या माघी यात्रेची सांगता

कळस : रूई (ता. इंदापूर) येथील बाबीर देवाची माघी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रे निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले सुमारे पन्नास हजार भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळी देवाचा पालखी सोहळा पार पडला. यानंतर अभिषेक व महापुजा झाली. मंगळवारी (दि. 18) दिवसभर भाविकांनी नवसाची परतफेड केली.
देवस्थान व ग्रामपंचायत यांनी पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था केली होती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कळस यांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. देवाची यात्रा वर्षभरात दिवाळी पाडवा व माघीयात्रा अशी दोन वेळेस भरते.
दिवाळीत मोठ्या यात्रेला ज्या भाविक भक्तांना देवदर्शनासाठी उपस्थिती लावता येत नाही, ते भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात. माघ पौर्णिमा झाल्यानंतर पाच दिवसांनी ही यात्रा भरते. सोनाई उद्योग समुहाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून यामध्ये भव्यमंडप, शिखर, हॉल बांधण्यात आला आहे.
यात्रेसाठी देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब भगत यांनी परिश्रम घेतले. यावेळी साहेबराव मंडलिक, बुवाजी दादा पुणेकर, बबनराव सांगळे उपस्थित होते.





