Sharad Pawar : “शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते” बड्या नेत्याचे विधान
"... तर सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळू शकते"

Sharad Pawar : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी २०१९ मध्ये शरद पवार आमच्यासोबत आले असते तर ते राष्ट्रपती झाले असते, असा दावा केला आहे. तसेच सुप्रिया सुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता असून, या विस्तारात खासदार सुप्रिया सुळे यांना स्थान मिळू शकते, असे सूचक विधान आठवले यांनी केले. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासह राज्यातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
शरद पवार यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रवेशाबाबत विचारले असता, पवार आघाडीत येतील असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. अजित पवार यांनीही शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यांनी ते ऐकले नाही, असे आठवले म्हणाले.
तसेच सुप्रिया सुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आल्या तर आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेले आंदोलन संविधानविरोधी आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करावी, तसेच रस्त्यावर चर्चा करण्याचे आव्हान देण्यापेक्षा संसदेत येऊन चर्चा करावी, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
जनता जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य
ईव्हीएम मोदींनी आणलेले नाही, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास आमचा विरोध नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. २०२९ च्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले नाही, तर राहुल गांधी यांचे अभिनंदन करू. जनता जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पूर्णेकर प्रकरणात कोणावरही अन्याय न करता पोलिसांनी निष्पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा:






