Pune District : बिहार झेडपीच्या सीईओंची वराळेला भेट

आंबेठाण : खेड तालुक्यातील वराळे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथे बिहार राज्यातून आलेले जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद सीईओ यांच्या अभ्यास दौर्यानिमित्त एकूण 30 जणांच्या संघाने वराळे गावास भेट दिली.
पाहुण्यांचे स्वागत भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, वराळे गावच्या सरपंच पूजा बुट्टे पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील देवकर, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला चव्हाण, शुभांगी बुट्टे पाटील, गावच्या पोलीस पाटील उषा बुट्टे पाटील, ग्राम विकास अधिकारी नीलिमा जाधव, माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील, रामदास काळे यांनी शाल, टोपी, श्रीफळ देऊन केले.
ग्रामपंचायत कार्यालय पोलीस पाटील कक्ष, अंगणवाडी शाळा तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी दिल्या. ग्रामपंचायत बद्दल सरपंच पूजा बुट्टे पाटील यांनी माहिती दिली. जिल्हा परिषद, शाळेतील भौतिक सुविधा,शैक्षणिक वातावरण, डिजिटल वर्ग तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून सर्वांनी शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रम पाहून तर सर्व आश्चर्यचकित झाले.
शिवाय वराळे शाळेत फक्त वराळे गावातीलच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून स्थलांतरित झालेल्या मुलांशी त्यांनी संवाद साधला आणि वराळे शाळा ही जिल्हा परिषदचे नसून देशाची शाळा आहे असे मत व्यक्त केले कारण देशाच्या प्रत्येक राज्यातून एक तरी मुलगा या शाळेत शिक्षण घेतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण घोडे यांनी केले तर स्वागत गीत सोनाली लोंढे यांनी सादर केले. विजयालक्ष्मी जडे यांनी आभार मानले.





