Pune District : ओतूर बस स्थानकातील दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ओतूर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील ओतूर बसस्थानकाची मोठी दुर्दशा दिसून येत असून स्थानकापुढे खड्डेच खड्डे तर स्थानकाच्या मागच्या बाजूला सांडपाण्याचा विळखा पडल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना या बस स्थानकामध्ये बसची वाट पाहताना नाकाला रुमाल लावण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबरच येथील व्यावसायिक, स्थानिक नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे बस स्थानक खड्ड्यात असल्याने याठिकाणी पावसाचे साचलेले पाणी काढून देण्यासाठी योग्य नियोजन न झाल्याने पावसाळ्यात याठिकाणी पाण्याची डबकी तयार होत आहेत. तसेच बस स्थानकाच्या बाजूलाच सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. या सुलभ शौचालयाचे सांडपाणी उघड्यावरच सोडून दिले जात असल्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार एसटी महामंडळाला पत्र व्यवहार केला. परंतु अद्याप या संदर्भामध्ये कोणतीही उपाययोजना होत नसल्याची खंत ओतूरच्या सरपंच छाया डुंबरे तसेच सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी व्यक्त केली आहे.
भविष्यकाळात या सांडपाण्यामुळे बस स्थानक परिसरातील तसेच ओतूर शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले तर याला जबाबदार एसटी महामंडळाचे अधिकारी राहतील. आम्ही याबाबतची तक्रार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे करणार आहे.
-छाया तांबे, सरपंच ओतूर
या संदर्भात अनेकदा मी स्वतः नारायणगावचे आगार व्यवस्थापक वसंत आरगडे यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. अधिकारी येतात पाहणी करतात पावसाळ्यामध्ये खड्डे पडल्यावर ग्रामपंचायत अथवा संबंधित विभाग तात्पुरते खड्डे बुजवतातय परंतु जास्त पाऊस झाल्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष पाचवीलाच पुजला आहे. जास्तीचा पाऊस आला का या खड्ड्यामध्ये पुन्हा चिखल होतो, पाणी साठते आणि प्रवाशांच्या अंगावर हे चिखल युक्त पाणी उडते. तसेच बाजूच्या खड्ड्यामध्ये पाणी साठून राहिल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढू लागल्याने प्रवासी व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
-तानाजी तांबे, सामाजिक कार्यकर्ते
सुलभ शौचालयाचे सांडपाणी बस स्थानकाच्या मागच्या बाजूला उघड्यावर सोडले जात असल्याने दुर्गंधीचा प्रवासी व आजूबाजूच्या दुकानदारांना याचा त्रास होतोय तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होतोय ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आम्ही हे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या पाइपलाइनला जोडण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने सहकार्य करावे, अशी विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे हा प्रश्न रेंगाळत पडला आहे.
-वसंत आरगडे, आगार व्यवस्थापक
पावसाळ्यामध्ये बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते. डास वाढतात. त्यामुळे आमच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. तसेच सांडपाणी देखील बस स्थानकाच्या मागच्या बाजूला उघड्यावर असल्याने दुर्गंधीचा देखील प्रवासी आजूबाजूचे नागरिकांना त्रास होत आहे. हे सांडपाणी ग्रामपंचायततीच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जावे.
-सखाराम मिलखे, वाहतूक नियंत्रक





