पुणे जिल्हा : 500चा स्टँप 1500 रुपयांना

खेड तालुक्यात मुद्रांक विक्रेत्यांकडून काळबाजार सुरू : अधिकारी मूग गिळून गप्प
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – शासनाने कोणत्याही शासकीय कामासाठी 500 रुपयांचा स्टँप (मुद्रांक) सक्तीचे केल्याने नागरिकांची मागणी वाढली मात्र खेड तालुक्यात स्टँपचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी तुटवडा दाखवत काळा बाजार सुरू केल्याची तक्रारी तहसीलदार कार्यालयाकडे होत आहेत. दरम्यान, 500 रुपयांचा स्टँप पेपर 1000- 1500 देऊन खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली असल्याने जनतेकडून संताप व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यात 21 शासकीय परवानाधारक मुद्रांकविक्रेते कार्यरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तसेच शालेय प्रवेश प्रक्रीया सुरू असताना शासनाने यापुढे शासकीय दाखले आवश्यक प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे स्टँप पेपर आदेश जारी केले आहे. यावर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर शासनाने 100 रुपयांचे स्टँम पेपर जोपर्यंत उपलब्ध आहेत, तोपर्यंत ठराविक प्रतिज्ञापत्रासाठी 500चा स्टँपची अट शिथिल करण्याचा प्रयत्न केला होता.
गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुका होत्या त्यामुळे स्टँपला मागणी कमी झाली होती अनेक शासकीय कामे याकाळात होत नव्हती. बुधवार (दि. 27) पासून शासकीय कार्यालयांचा कारभाराचा गाडा पुर्ववत सुरू होताच 500 रुपयांच्या स्टँपचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टँप दुप्पट तिपटीने सर्वसामान्य नागरिकांवर खरेदी करण्याची नामुष्की आली आहे.
मुद्रांक शुल्क विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकाची आहे. तालुक्यात राजगुरूनगर येथे 2 आणि चाकण येथे 1 असे मिळून 3 दुय्यम निबंधक कार्यालय कार्यरत आहेत. 500 रुपयांचा स्टँप तुटवडा असल्याने अवाजवी दराने विक्री होत असताना अधिकारी मात्र निवडणुकीच्या गर्तेत अडकल्याचे कारण देत मूग गिळून गप्प आहेत.
महा ई सेवा केंद्र, अधिका-यांची मिलिभगत?
शासनाने शासकीय कामकाजात 500 रुपयांचे स्टँप अनिवार्य केला असला तरी 100 रुपयांचे 5 स्टँप पेपर जोडुन शासकीय कामकाजासाठी प्रतिज्ञापत्रासाठी वापरुन आपले शासकीय कामकाज होऊ शकते मात्र महा ई सेवा केंद्र चालक मात्र 500 रुपयाचा स्टँप आणण्याचा आग्रह करुन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचे पहावयास मिळत आहे. महा ई सेवा चालकांनी 100 रुपयाचे पाच स्टँप पेपर असतील तरी चालतील असे मार्गदर्शन करण्याचे कष्ट घेण्याऐवजी मुद्रांकविक्रेते आणि महा ई सेवा चालकासह शासकीय अधिका-यांची मिलिभगत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
ट्रेझरीकडून दिशाभूल सुरू?
राजगुरूनगर येथील तहसीलदार कार्यालयात ट्रेझरी अर्थात उपकोषागारातुन माहिती घेतली असता सध्या 500 रुपयांचा स्टँपचा तुटवडा आहे. मात्र 100 रुपयांचे स्टँप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे सांगण्यात आले. यावरुन मुद्रांकविक्रेत्यांनी मुद्दामहुन 100 रुपयाचे स्टँप विक्रीस ठेवणे आवश्यक असले तरी सर्वसामान्य नागरीकांची दिशाभुल करण्यात येत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्टँपचा काळाबाजार सुरू आहे स्टँपच्या किमती पेक्षा जास्त रक्कमेला स्टँप खरेदी करावी लागते तुटवडा दाखवून जनतेला वेठीस धरल्याचे प्रकार घडत आहेत ते त्वरित थांबले नाही तर जनआंदोलन केले जाईल.
– विजय डोळस, अध्यक्ष, काँग्रेस, खेड तालुका
खेड तालुक्यात स्टँप तुटवड्याला प्रशासन कारणीभूत आहेत. 100 आणि 500 रुपयांचे स्टँप जास्त किमतीला विकले जात आहेत आता अनेक शासकीय कामासाठी 500 रुपयांचा स्टँप सक्तीचा केल्याने त्याचा कुत्रिम तुटवडा निर्माण करून जनतेकडून जास्त पैशात विकला जात आहे. लोकांची अडवणूक केली जात आहे. याला अधिकारी जबाबदार आहेत. विक्रेत्यांची दप्तर तपासणी वेळेत होणे आवश्यक आहे.
– नितीन सैद, माहिती अधिकारी कार्यकर्ते
100 चा स्टँप 150-200 रुपयाला विकला जातो हा प्रकार भ्रष्टाचार आहे. नागरिकांची अडवणूक करून जास्तीच्या किमतीचे स्टँप विकले जात आहेत. गैसरौय होऊ नये म्हणून नाईलाजास्तव नागरिक खरेदी करतात अनेक कोरे स्टँप पेपर इतरांच्या नवे दाखवतात आणि नंतर पाच ते सात वर्षांनंतर हेच स्टँप हजारो रुपयांना विकले जातात असे अनेक प्रकार तालुक्यात घडले आहेत.
– प्रकाश पाचारणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा





