Pune District : सिंचन योजनांच्या विजेसाठी उपोषण
Pune District : बँका आणि अन्य माध्यमातून कर्ज काढून प्रत्यक्ष पाईपलाईन देखील मे २०२५ मध्ये पूर्ण केली आहे.या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील दुष्काळी परिसर असलेल्या धामणी परिसरातील उपसा सिंचन योजनांच्या शेती पंपांना त्वरित वीज कनेक्शन द्यावे या मागणीसाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून माजी सरपंच सागर जाधव यांच्यासह एकूण २५ शेतकरी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या बरोबर परिसरातील महिलाही उपोषणामध्ये सहभागी झाल्या आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी नऊ गट स्थापन करून डिंभे कालव्यावरून सात कोटी रुपये खर्च करून एकूण नऊ उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाणी परवाना काढला. बँका आणि अन्य माध्यमातून कर्ज काढून प्रत्यक्ष पाईपलाईन देखील मे २०२५ मध्ये पूर्ण केली आहे.या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
शेतीपंपासाठी राज्य सरकारने सोलर धोरण आणले आहे. काही महिन्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर महावितरणने येथे एक सोलर पंप प्रकल्प राबवला परंतु तो पूर्ण क्षमतेने चालला नाही.सोलर पंपावरील उपसा सिंचन योजना ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सोमवारी (दि.२२) रोजी सकाळी शेतकऱ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून ग्रामपंचायतसमोरील पंचाच्या पारावर सागर जाधव व २५ शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी माजी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे, सुभाषनेते जाधव यांची भाषणे झाली.
मंगळवार (दि. 23) उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत निकम व पारगाव गणाच्या पंचायत समिती च्या सदस्या श्वेता ढोबळे, भाजप चे तालुका अध्यक्ष किरण वाळुंज, शिवसेना उपतालुका प्रमुख किरण ढोबळे, निरगुडसर सरपंच रवींद्र वळसे यांनी घटनास्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला.





