Pune District : १८ जागांसाठी तब्बल ५२ उमेदवार रिंगणात; महायुतीच्या पॅनलविरोधात शरद पवार गट मैदानात
त्यामुळे महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. यावेळी अपक्षांनी मैदानात उडी घेतल्याने अपक्षांची मोट बांधली जाण्याची शक्यता आहे.

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २१४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज छाननीनंतर २६६ अर्ज वैध ठरले होते. मात्र, अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान तहसील कार्यालयात दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता.
दरम्यान, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने एकत्र येत अधिकृत पॅनल जाहीर केले. यावेळी आमदार माऊली कटके, राष्ट्रवादीचे (अजित पवार) तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महायुतीच्या पॅनलमध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून प्रमोद पऱ्हाड, संतोष शिंदे, शशिकांत दसगुडे, स्वप्निल गायकवाड, विजय ढमढेरे, राहुल गव्हाणे व बापूसाहेब शिंदे यांचा समावेश आहे. तर ओबीसी गटातून राजेश लांडे, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून सुहास मलगुंडे, महिला राखीव गटातून प्रतिभा नागवडे व सुजाता नरवडे यांना उमेदवारी दिली आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गटातून सागर दंडवते व संतोष मोरे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून संभाजी कर्डिले, तर अनुसूचित जाती-जमाती गटातून वैष्णव इसवे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे.
सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी १ हजार ५८९ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २०६ मतदार, व्यापारी-आडते मतदारसंघाच्या २ जागांसाठी ४६४ मतदार आणि हमाल-मापाडी मतदारसंघाच्या १ जागेसाठी १३७ मतदार मतदान करणार आहेत. एकूण २ हजार ३९६ मतदार १८ जागांचे भवितव्य ठरविणार असल्याने निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे
अशोक पवार सक्रिय
शरद पवार गटाकडून मातब्बर उमेदवार रिंगणात
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २१४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार अशोक पवार यांनी पक्षाच्या वतीने माघारीच्या दुसऱ्या दिवशी पॅनल स्थापन करीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. यावेळी अपक्षांनी मैदानात उडी घेतल्याने अपक्षांची मोट बांधली जाण्याची शक्यता आहे. त्यांचा फटका कोणाला बसतो, याकडे लक्ष लागले आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण मतदारसंघातून संतोष बाळासाहेब भोसले, विश्वास रामकृष्ण ढमढेरे, राजेंद्र रंगनाथ
गायकवाड, संभाजी शिवाजी फराटे, उत्तम माणिकराव शेलार, ज्ञानेश्वर बबनराव थेऊरकर, शिवाजी सुखदेव वडघुले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातील निवडणुकीसाठी नामदेव महादेव जाधव, ग्रामपंचायत- अनुसूचित जाती – जमाती मतदार संघातील निवडणुकीसाठी बाळासाहेब दादाभाऊ जाधव, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील निवडणुकीसाठी नानासाहेब अनंथा साबळे, सहकारी संस्था- विमुक्त जाती- भटक्या जमाती मतदारसंघातील निवडणुकीसाठी सतीश भागुजी कोळपे, सेवा सहकारी संस्था इतर मागास वर्गीय मतदार संघातील निवडणूक विकास काशिनाथ शिवले, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून शशिकला नानाभाऊ फुलसुंदर, राजश्री रवींद्र फराटे हे उमेदवार शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत. इतर उमेदवार हे वेगवेगळ्या चिन्हावर स्वतंत्ररीत्या लढत आहे.





