पुणे जिल्हा : छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 269 कोटींचा विकास आराखडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
लोणीकंद – छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसे स्मारक शासनाच्या वतीने साकारण्याचा अनेक दिवसांचा संकल्प होता. स्मारक विकासाठी 269 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, तुळापूर येथे स्मारकासाठी आठ एकर जागा उपलब्ध झाली आहे.
तर वढु बुद्रुक येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटलला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आणि परिसराची विकास कामे करण्यात येतील. या कामांतर्गत संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने,
छत्रपती संभाजी महाराज यांचे 60 ते 65 फूट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची व साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भीमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
श्री. पवार म्हणाले, येत्या 30 महिन्यांत हे काम पूर्ण होईल. समाजासमोर आदर्श ठेवणारे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे शौर्य, इतिहास नवीन पिढीला समजावा यासाठी ही स्मारकस्थळे सदैव प्रेरणादायी ठरतील. हे स्मारक दर्जेदार आणि अभिमानास्पद व्हावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करत असताना शासन कुठेही कमी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.





