पुणे जिल्हा : पाटाच्या पाण्याद्वारे 157 टन उसाचे उत्पन्न

पिसुर्टीतील भुजबळ यांचे 65 गुंठे क्षेत्रात यशस्वी उत्पादन
वाल्हे – श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद पिसुर्टी (ता.पुरंदर) गावचे प्रयोगशील शेतकरी अनंता महादेव भुजबळ व मुलगा प्रशांत भुजबळ यांनी चालू हंगामामध्ये पाटाच्या पाण्याद्वारे 65 गुंठे जमिनीत 157 टन उसाचे उत्पन्न घेतले असल्याची माहिती कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते यांनी दिली.
भुजबळ यांनी 65 गुंठे जमिनीला 6 चारचाकी ट्रॉली शेणखत टाकून शेतीची उभी-आडवी नांगरी केली. यानंतर साडेचार फूट सरी काढली. यामध्ये को-86032 उसाच्या रोपाची लागवड दोन फूट अंतरावर केली होती. यानंतर शेणखत, जैविक खते, रासायनिक खताचा वापर केला होता. दोन वेळेस ड्रिचींग, दोन वेळेस फवारणी केली.
ऊस बांधणी करण्या आगोदर दोन रासायनिक खताचे डोस दिले. मोठ्या बांधणीला कॅल्शियम, पोटॅश, इतर रासायनिक खते दिली होती. दर महिन्याला खते देण्यात आली होती. रासायनिक खतांचे मार्गदर्शन नीरा येथील जे के फर्टिलायझरचे सुरेश शेळके, श्री सोमेश्वर कारखान्याचे चिट बॉय रणजीत जगताप यांनी केले असल्याची माहिती प्रशांत भुजबळ यांनी दिली.
अनेक ऊस उत्पादकांनी चांगल्या प्रतिचे ऊस उत्पादन घेताना,ठिंबक सिंचनचा वापर केला असल्याचे दिसून येते. मात्र,भुजबळ यांनी पाट पाणी देऊन सरासरी एकरी 97 टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे.
एका उसाचे वजन साडेतीन किलो
काढणीस आलेल्या एका उसाच्या टिपर्या 45 ते 46 इतक्या होत्या.तर,साधारणपणे एका उसाचे वजन तीन ते साडेतीन किलो दरम्यान होते. जैविक खते दरवर्षी वापरत आहे. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होत असून तो टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खत, जीवाणू व इतर खतांचा वापर केला पाहिजे; असे ऊस उत्पादन शेतकरी अनंता भुजबळ यांनी सांगितले.





