pune : पालखी दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी

पहाटेपासूनच रांगा; वारकऱ्यांसाठी मंडळांचे नियोजन
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी पालखी मुक्कामस्थळी गर्दी केली. पहाटेपासूनच पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंगा विठोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
पेठांमध्ये दिंड्यांची मुक्कामाची व्यवस्था अनेक संस्था, मंडळे आणि राजकीय व्यक्तींनी केली होती. वारकऱ्यांना सकाळच्या चहा- नाश्त्यापासून ते सकाळ, संध्याकाळचे जेवण आदींचीही व्यवस्था करण्यात आली होती. गृहनिर्माण सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये वारकरी मुक्कामी होते. त्याठिकाणीही जेवणाची व्यवस्था मंडळांनी, नागरिकांनी केली. या वारकऱ्यांनी जेवणाच्या आधी आणि सायंकाळी कीर्तन, भारूड, गवळणी सादर केल्या.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचे खाण्यापासून ते विविध वस्तूंचे स्टाॅल्स दुतर्फा लागले होते, तसेच वारकऱ्यांच्या कपाळावर लावला जाणारा नाम त्यांच्या अनेक प्रकारच्या साच्यांचे स्टाॅल पथारी व्यावसायिकांनी लावले होते. याशिवाय पोळपाट, लाटणे, काटवटपासून ते अनेक गृहपयोगी लाकडी साहित्य, कलाकुसरीचे, सजावटीच्या साहित्यांचे स्टाल्स पथारी व्यावसायिकांनी लावले होते. त्यामुळे भवानी पेठ, नाना पेठ या भागाला जत्रेचे स्वरूप आले होते.
पालखी दर्शनासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.पालखी विठोबा मंदिराचे आवार तुलनेने मोठे केल्यामुळे नागरिकांची चेंगराचेंगरी आणि दर्शनासाठी अडचण झाली नाही. निवडुंगा विठोबा मंदिरात मात्र काही नागरिकांनी रांगेत न थांबता लांबूनच दर्शन घेणे पसंत केले.
पालखी आणि वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी विविध संस्थांनी, तसेच प्रशासनाने मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही केली होती. याशिवाय ठिकठिकाणी डोळे तपासणी आणि अन्य तपासण्या करण्याची सोय, चष्मे देण्याची सोय केली होती. त्याचा अनेक वारकऱ्यांनी लाभ घेतला.





