Pune : शिक्षकांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे

पुणे – राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील बहुसंख्य शिक्षक जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळविण्यासाठी विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येणार असल्याने आता संबंधित शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षकांमध्ये विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला शिक्षक, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा शिक्षकांचा समावेश केला जातो. सोयीच्या शाळांमध्ये शिक्षक वर्षानुवर्षे काम करीत असतात.
काही ना काही तरी कारणे दाखवून संबंधित शिक्षक सतत बदली टाळत असतात. त्यातही प्रामुख्याने गंभीर आजाराची अथवा दिव्यांगाबाबतच्या कारणांनाच अधिक प्राधान्य देण्यात येते. त्यासाठी शिक्षक खोटी कागदपत्रे मिळवून ती दाखल करण्याचा धडाकाही लावतात.
खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळविणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याची बाबही उघडकीस आलेली आहे. काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे, याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशही बजाविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचे कार्यासन अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना जारी केल्या आहेत.
शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता आढळून आल्यास जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून तपासणी करून घेण्यात येणार आहे. विविध आजारांबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिक्षकांचीदेखील जिल्हा शल्य चिकीत्सकांमार्फत फेरतपासणी करण्यात येणार आहे.
घटस्फोटीत किंवा परित्यक्ता महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटीत शिक्षिकेबाबत न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, परित्यक्ता शिक्षिकेने ती पतीबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र, त्यांच्या रहिवासाचे दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका यावरून पडताळणी करण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षिकांच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा केली जाणार आहे.





