प्रभात वृत्तसेवा पुणे – कोथरूडमधील एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्यास जाब विचारल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.याबाबत ज्येष्ठाने कोथरूड ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मयूर काॅलनीतील एका सोसायटीत राहतात. सोसायटी परिसरात एक गोदाम असून गुरुवारी (९ ऑक्टोबर) रात्री अकराला गाेदामातील कामगार एकाचा वाढदिवस साजरा करत होते. आरडाओरडा करत असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी टोळक्याला हटकले. प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालू नका, असे सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एकाने तीक्ष्ण शस्त्र उगारुन दहशत माजविली, नागरिकांना शिवीगाळ केली. याची माहिती तक्रारदार ज्येष्ठाने पोलिसांना दिली.पोलिसांनी पसार झालेल्या टोळक्यातील सहाजणांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.