Pune Crime: आत्महत्या की घातपात? १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूने पुण्यात खळबळ; ६ जणांवर गुन्हा
Pune Crime: मुलगा पळताना नदीत पडला की त्याचा घातपात झाला? ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार.

Pune Crime- अल्पवयीन शिवकुमार बाबू वखरानी (१७ वर्षे ७ महिने, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) याच्या मृत्यू प्रकरणी, बंडगार्डन पोलिसांनी आकाश रेड्डी, स्वाती रेड्डी, गौरव शिंदे, आशिष चाबुकस्वार या चौघांना अटक केली आहे. तर आनंद रेड्डी, सुरज उर्फ चऱ्या मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश रेड्डी याने पत्नीसोबत बोलत असल्याच्या संशयातून आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप करीत शिवकुमार याच्या आईने फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. २९) सकाळी ८:३०च्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवकुमार याचा मृतदेह नदीत मिळून आल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तो पळताना नदीत पडला की त्याच्या सोबत घातपात झाला याचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार (दि.२६ सप्टेंबर) रात्री १०:०० ते ११:००च्या दरम्यान शिवकुमार हा घरातून बेपत्ता झाला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्या आईने फिर्याद दिली, त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू असतानाच शिवकुमारचा मृतदेह चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात आढळून आला. पत्नीसोबत बोलत असल्याचा अकाश याला संशय होता,
त्यातूनच शनिवारी रात्री शिवकुमार याला दुचाकीवरून बंडगार्डन बंधारा येथील बर्निंग घाट परिसरात तो घेऊन आला यावेळी आकाश याची पत्नी स्वाती देखील बरोबर होती, इतर आरोपी पाठीमागून तेथे आले. आकाश याने शिवकुमार याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे तो घाबरून पळून गेला. यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग केला. पळून जात असताना शिवकुमार नदीपात्रात पडला की त्याच्यासोबत घातपात झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार…
चंदननगर पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. मात्र, आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातवाईकांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांचीही दखल घेण्यात आली असून, त्या अनुषंगाने आवश्यक तपास केला जात आहे, बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहेत.






