Pune Police: पोलिसांची धडक कारवाई! पोलिसांची टोपी घालून कॅबचालकाला धमकावणारा ‘तोतया’ गजाआड!
Pune Police: कॅबच्या वायपरचे पाणी उडाल्यावरून पोलिसांची टोपी घालून मारला होता रुबाब; व्हिडिओ व्हायरल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तपासाचे आदेश.

Pune Police- पोलिसांची टोपी घालून कॅबचालकाला शिवीगाळ करीत रुबाब झाडणाऱ्या तोतयाला अखेर शिवाजीनगर पोलिसांनी शोधून काढले. मजहर मजीद शेख (२७, रा. बुरूड आळी, शिरूर) असे त्याचे नाव आहे. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून, त्याच्याविरुद्ध महिला पोलिस अंमलदार अश्विनी गगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरात कॅबचालकाला धमकावत असल्याचा शेख याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये शेखने डोक्यावर पोलिसांची टोपी घातली होती. कॅबच्या वायपरचे पाणी डोळ्यांवर उडाल्याच्या कारणावरून त्याने चालकाची चावी काढून घेतली आणि त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, तसेच डायल ११२ ला फोन करतो, तू बाहेरचा आहेस, मी इथला आहे, असे म्हणत धमकावले.
कॅबमधील एक महिला शेखला विनंती करीत असतानाही त्याने पोलीस असल्याच्या आविर्भावात त्यांना दरडावले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून शेखचा शोध घेतला. गणेशखिंड रस्ता परिसरात हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले.
नाहक टीकेचे धनी
तोतया शेखचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या नावाने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. मात्र, तपासानंतर संबंधित व्यक्ती पोलीस दलातील नसून तोतया असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या प्रकारामुळे पोलिसांना नाहक टीकेला सामोरे जावे लागले.





