MPCB Action: तलावात सोडले रसायनमिश्रित पाणी! कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई
MPCB Action: 'दैनिक प्रभात'च्या वृत्ताची तातडीने दखल घेत एका कारखान्यातून येणारे दूषित पाणी बंद; इतर संशयित कारखान्यांना नोटिसा.

MPCB Action- चाकण औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी कुरुळी येथील पाझर तलावात मिसळत असल्याचे वृत्त ‘दैनिक प्रभात’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. खेड पंचायत समिती, कुरुळी ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी पाझर तलावाची पाहणी करून एका कारखान्यातून तलावाकडे येणारे दूषित पाणी तातडीने बंद केले.
दरम्यान, परिसरातील इतर संशयित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्या विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रदूषणाचा नेमका स्रोत कोणता आणि त्यास जबाबदार कोण, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पाझर तलावात दूषित पाणी सोडणार्या कारखान्यांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
संबंधित कंपन्यांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साळुंखे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मलघे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ढोके, शांताराम घाडगे, बाबासाहेब सोनवणे, रामनाथ सोनवणे, सखाराम बागडे, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.
पाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. एका कारखान्यावर झालेली तातडीची कारवाई आणि इतर संशयित कारखान्यांना बजावलेल्या नोटिसांमुळे ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, तपासणी अहवालानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





