Pune Crime : रिक्षा बनली लुटारू वाहन! चाकूने धमकावून रोख रक्कम आणि मोबाइल लुटले ; आरोपीला अटक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या रिक्षाचालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली. रिक्षाचालकाबरोबर लुटमारी करणाऱ्या दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने चोरलेल्या मोबाइलची संकेतस्थळावर विक्री केली. त्याच्याकडून ३० मोबाइल संच जप्त केले.या प्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (रा. जामा मशीदजवळ, आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक केली आहे.
हडपसर भागातील नवीन म्हाडा वसाहतीजवळ रिक्षातील तिघे परप्रांतीय बांधकाम मजुरांना मोबाइल विकत असल्याची माहिती वानवडी ठाण्यातील पोलीस अतुल गायकवाड, अमोल पिलाणे यांना मिळाली. घटनास्थळी पोलिस आल्याचे पाहून फैजान व साथीदारांनी पलायनाचा प्रयत्न केला.रिक्षा तपासणीत चाकू, मोबाइल सापडले. चौकशीत आरोपींनी प्रवाशांना चाकूच्या धाकाने लुटल्याचे मान्य केले. आरोपी प्रवाशांना शिवाजीनगर स्थानकात सोडण्याची बतावणी करत ५० रुपये भाडे घ्यायचा. रेसकोर्स, भैरोबानाला परिसरातील निर्जन भागात प्रवाशांना लुटून रोकड, मोबाइल घ्यायचे.





