pune crime : एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा छळ करणाऱ्याला तीन दिवसात शिक्षा

पुणे – एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा पाठलाग करणे, तसेच फोनवर बोलून त्रास दिल्या प्रकरणाचा निकाल अवघ्या 3 दिवसात लागला आहे. चंदननगर पोलिसांनी दोन दिवसात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.पी.शेळके यांनी शिक्षा सुनावली.
विनयभंग आणि धमकावणेच्या कलमानुसार 7 दिवसांची कैद आणि 200 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात 2 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. 5 ऑगस्ट रोजी निकाल झाला.
अमोल नानाजी कांबळे (रा. थिटे वस्ती, खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे योगेश कदम यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कमासाठी कोर्ट अंमलदार हवलदार राहुल शिंदे यांनी मदत केली.
घटना घडलेल्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी त्याला तात्काळ अटक करण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी त्याची रवानगी कारागृहात झाली. 48 तासच्या आत म्हणजे 4 ऑगस्ट रोजी दोषारोपपत्र दाखल झाले. तर 72 तासाच्या आत म्हणजे 5 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात आली.





