Pune Crime – मार्केट यार्डमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लासमधील ऑफिस बॉयने विद्यार्थ्याला स्टोअर रूममध्ये नेऊन त्याच्याशी अनैतिक कृत्य केले या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून, पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तीन महिन्यांपासून अत्याचार पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विकास दिलीप गायकवाड (वय ३०) हा तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार अकॅडमीच्या परिसरातच घडत होता. इतकेच नव्हे तर आरोपीने या कृत्यांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचाही संशय असून, त्या आधारे मुलाला ब्लॅकमेल केले का? , याचा तपास पोलिस करत आहेत. मार्केटयार्ड पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ५(एफ), ५(एल), ६ तसेच आयटी ॲक्टच्या कलम ६७(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील व्हिडिओ, चॅट्सची तपासणी सुरू आहे. घटना घडल्यानंतर हा विद्यार्थी घरी परतल्यावर रडत रडत आई-वडिलांकडे गेला. तो क्लासला जाण्यास जाण्यास नकार देत होता. त्याच्या अस्वस्थ वागणुकीमुळे वडिलांना संशय आला. त्यांनी मुलाची सविस्तर विचारपूस केली आणि क्लासमध्ये जाऊनही चौकशी केली. अखेर मुलाने घडलेला सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलाच्या तोंडून ही भयानक माहिती ऐकल्यावर पालकांनी तत्काळ मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः लक्ष घालत तपास जलदगतीने करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात केवळ आरोपीवरच नव्हे तर अकॅडमीच्या व्यवस्थापनावरही कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम योग्यरीत्या पाळले गेले का ? याची विचारणा पालक करत आहेत.