रामचंद्र सोनवणे राजगुरुनगर : शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कोर्ट रस्त्यानजिक असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेस या खाजगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे लेक्चर सुरू असतानाच, त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रावर धारदार हत्याराने गळा चिरून त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास दहावीचे नियमित लेक्चर सुरू होते. लेक्चर सुटण्याच्या वेळेत शेजारी बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अचानक वाद उफाळून आला. त्याच वेळी शेजारी बसलेल्या मित्राने पुष्कर दिलीप शिंगाडे (वय अंदाजे १५–१६) याच्यावर धारदार हत्याराने गळा चिरून तसेच पोटात व डोक्यात वार केले. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांच्या समोरच घडल्याने वर्गात एकच गोंधळ उडाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कोचिंग क्लासमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत पुष्कर शिंगाडे आणि हल्लेखोर विद्यार्थी हे दोघेही एकाच वर्गातील मित्र होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वादातूनच मनात राग धरून हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी स्वतःहून खेड पोलिस ठाण्यात हजर झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कोचिंग क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे जबाब, तसेच वापरलेल्या हत्याराची तपासणी सुरू आहे. अल्पवयीन आरोपी असल्याने प्रकरणाबाबत बाल न्याय अधिनियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात शोककळा पसरली असून, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात असून, कोचिंग क्लासेस व शाळांमध्ये शिस्त, समुपदेशन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील नेमकी कारणे, हत्यार कोठून आणले गेले, तसेच पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.