Pune Crime : शिकवणी वर्गात अश्लील वर्तन! शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई

प्रभात वृत्तसेवा
पुणे – विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सुरेश दौलत रौंदळ (४६, रा. गौरव राज बिल्डिंग, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) असे अटक केलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रौंदळकडे शिकवणीला जायची. स्वारगेट भागात रौंदळ खासगी शिकवणी चालवतो.
गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच असता, आरोपी रौंदळने तू शिकवणीला प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे, असे म्हणत मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने ही माहिती कुटुंबीयांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.आरोपी रौंदळला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली असून, उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.




