Pune Crime | ऑनलाईन प्रेम फसवं ठरलं ; पुण्यातील मुलगी बंगालमध्ये अत्याचाराची शिकार

प्रभात वृत्तसेवा
पुणे : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे नवे मित्र, नवे संबंध सहज जुळतात. मात्र, त्याचे दुष्परिणामही गंभीर असतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ऑनलाइन पब्जी गेम खेळताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख पश्चिम बंगालमधील तरुणाशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच, मुलगी प्रियकरासोबत घर सोडून पश्चिम बंगालला गेली. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचा शोध घेत तिला सुरक्षित परत आणले. मात्र, पुढील तपासात प्रियकराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिस तपासात, आरोपी प्रयण सिंघा (रा. नागरकाटा, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीची ओळख पब्जी गेमवरून त्याच्याशी झाली होती. सुरुवातीला व्हॉट्सऍप मेसेज व कॉलवरून त्यांचे बोलणे होत होते. यानंतर त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, जुलै महिन्यात आरोपी मुलीला पुण्यातून घेऊन गावी गेला. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या पालकांनी केली.
तांत्रिक तपासात तीचे लोकेशन पश्चिम बंगला येथे आढळले. तब्बल तीन दिवसांच्या शोधानंतर तीला परत आणण्यात यश आले. मात्र, तेव्हा आरोपी हाती लागला नव्हता. मात्र, पोलीस त्याच्या मागावर होते. चार दिवसांपूर्वीच त्याला पश्चिम बंगालमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या.उपनिरीक्षक मनीषा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत होती. याच दरम्यान तिची आरोपी सिंघाशी ओळख झाली आरोपीने तिला फूस लावून पश्चिम बंगालला नेले आणि लैंगिक अत्याचार केला. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अपहरण व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पॉस्को कायद्याअंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांचे पालकांना आवाहन..
मुलं कोणत्या ॲपवर वेळ घालवतात, कोणाशी बोलतात, हे जाणून घेणं पालकांसाठी गरजेचं आहे. संवाद नसेल तर मुलं चुकीच्या जाळ्यात अडकतात. वेळेवर लक्ष दिल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात, असा सल्ला पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.





