Pune Crime – चंदननगर परिसरात अल्पवयीन युवतींना धमकावून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दाेन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनयमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी बालाजी गुरुनाथ स्वामी (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. युवती अल्पवयीन असल्याची माहिती स्वामीला होती. त्याने युवतीवर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीच्या आईने त्याला जाब विचारला. तेव्हा आरोपी स्वामी हा पीडित युवतीच्या घरात शिरला, तिची आई आणि वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत. अशाच प्रकारच्या आणखी एक घटनेत अल्पवयीन युवतीवर बलात्कार करुन तिची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या ऋतिक रावसाहेब लोणके (वय २७, रा. सोमनाथननगर, वडगाव शेरी) याला पोलिसांनी अटक केली. याबाबत पीडित अल्पवयीन युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवतीला लोणके याने विवाहाचे आमिष दाखविले, तिच्यावर अत्याचार केला. ही बाब युवतीच्या मावशीला समजली. मावशीने लोणके याला जाब विचारला. तेव्हा मला तिच्याबरोबर बोलू दिले नाही, तर सोशल मीडिया युवतीची छायाचित्रे प्रसारित करेल, अशी धमकी दिली. लोणके याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यनंतर त्याला अटक करण्यात आली.