Pune Crime : पुणे रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा! ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी गजाआड
Pune Crime : पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी पूर्ण; नराधमाविरुद्ध पॉक्सो (POCSO) आणि अपहरणाचा गुन्हा दाखल.

Pune Crime – पुणे रेल्वे स्थानक परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असून रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील खांडवा येथील कुटुंब ऊसतोडणीचे काम आटोपून गावी परतण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी रात्री पुणे रेल्वे स्थानक आले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी असल्याने ते कुटुंब फलाट क्रमांक ३ वर झोपले होते. आरोपी त्यांच्याच शेजारी बसून प्रवास करत होता व गाडीत सामान उतरवताना मदतही करत होता. १७ फेब्रुवारीच्या पहाटे पीडितेचे वडील बाथरूमसाठी उठले असता मुलगी जागेवर दिसली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक व्यक्ती बालिकेला हात धरून प्लॅटफॉर्मच्या टोकाकडे नेताना दिसला. त्यानंतर जीआरपी व आरपीएफ पथकांनी रेल्वे परिसरात शोध मोहीम राबवून आरोपीसह बालिकेला ताब्यात घेतले. बालिकेने पोलिसांना सांगितले की, काका कुरकुरे देतो, असे सांगून तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.
तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले असून तिने तिने पोटदुखीची तक्रार केली. त्यानंतर तिची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली.आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध मुलीला पळवून नेणे, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या प्रवाशांच्या गर्दीत लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे.





