धक्कादायक! प्रेमाच्या जाळ्यात अडकली अल्पवयीन ; वारंवार बलात्काराने एचआयव्ही पॉझिटिव्ह

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नात्यातील व्यक्तीने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याने ती एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ससून रुग्णालयातील तपासणीत ही बाब स्पष्ट झाली असून याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिची मुलगी खडकी परिसरात राहतात. आरोपी हा कर्नाटक राज्यातील असून तो फिर्यादीचा दूरचा नातेवाईक आहे. त्याने मुलीशी मोबाईलद्वारे संपर्क साधून तिच्याशी ओळख वाढवली.
प्रेमाचे आमिष दाखवून तिला पुणे तसेच कर्नाटकातील त्याच्या गावी नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हा अत्याचार २०२१ पासून सुरू होता. दरम्यान, मुलगी आजारी पडल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथे रक्त तपासणीत ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने आईसमोर संपूर्ण घटना उघड केली.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड विधानातील बलात्कारासंबंधी कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संतोषी जाधव करत आहेत.
आरोपी कर्नाटकातील असून त्याचा शोध सुरू आहे.मुलगी काही दिवसांपुर्वी घरातून बेपत्ता झाली होती. त्यावेळी खडकी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. सापडल्यानंतर तिला मुंढवा येथील एका महिला आश्रमात ठेवण्यात आले. तेथेच तिची तब्येत बिघडल्याने केलेल्या वैद्यकीय तपासणीदरम्यान हा प्रकार उघड झाला.





