Pune Crime News : शहरातील जबरी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान पोलीस हवालदार हेमंत पेरणे आणि पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना माहिती मिळाली की, जबरी चोरीतील रेकॉर्डवरील आरोपी अस्लम शेख उर्फ बिल्ला आणि रेहान शेख (दोघे रा. नविन म्हाडा कॉलनी, ससाणे नगर, हडपसर) यांनी त्यांच्या साथीदारांसह शहरातील विविध भागांत जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण (युनिट-१) यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींनी सुमारे आठ दिवसांपूर्वी सोमवार पेठ परिसरातील शांताई हॉटेल चौकाजवळ ॲक्टिवा मोपेडवरून जाऊन एका व्यक्तीच्या खिशातून जबरदस्तीने ३० हजार रुपये काढून घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तसेच आरोपी अस्लम शेख याने कॅम्प परिसरातील शरबतवाला चौक येथे इतर साथीदारांसह एका इसमाचे पैसे चोरल्याचे कबूल केले. या संदर्भात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचीही उकल करण्यात आली आहे. अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात एकूण २१ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण , पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार निलेश साबळे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, मयुर भोसले, उमेश मठपती तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती मुल्का यांनी पार पाडली. हेही वाचा : Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने घेतलं अंबाबाईचं दर्शन! नतमस्तक होत केली प्रार्थना, व्हिडिओ व्हायरल