Pune Crime News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाचा धुमाकूळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Crime News: कोयता उगारुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पुणे : आखाड पार्टीत वैमनस्यातून तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची घटना लाेणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीनंतर तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला.
पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (२२, रा. लोणी काळभोर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी केलेल्या मारहाणीत भिसे जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे हा रिक्षाचालक आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तीन महिन्यांपूर्वी त्याला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्तांनी दिले होते. शहरातून तडीपार केल्यानंतर भिसे हा नांदेड परिसरात राहत होता. ७ ऑगस्ट रोजी त्याच्या आईने संपर्क साधला. तब्येत बरी नसल्याचे तिने सांगितले. तेव्हा भिसे हा आईला भेटण्यासाठी लोणी काळभोर परिसरात आला.
वैमनस्यातून आरोपींनी शिवीगाळ करत डोक्यात दगड घातला
रविवारी (९ ऑगस्ट) भिसेच्या मामाने त्याला आखाड पार्टीचे निमंत्रण दिले. सकाळी तो लोणी काळभोर परिसरातील एका मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत गेला. तेथील एका शेडमध्ये आखाड पार्टीनिमित्त जेवण तयार करण्याचे काम सुरू होते.
भिसे मामाला जेवण तयार करण्यासाठी मदत करत होता. त्या वेळी चैाघे आरोपी तेथे आले. वैमनस्यातून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्याच्या डोक्यात दगड घातला. भिसे याला सोडविण्यासाठी आलेल्या बाळा भांड याला आरोपींनी मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भिसे याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. जखमी अवस्थेतील भिसे याने कोयता उगारुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.
हेही वाचा:






