Pune Crime | कर्जाच्या नावे मोठा घोटाळा! बांधकाम व्यावसायिकाची कोटींची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची एक कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक सेनापती बापट रस्ता भागात राहायला आहेत. त्यांची आराेपींशी मागील वर्षी ओळख झाली होती.
बांधकाम व्यवसायासाठी माफक दरात खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला दाखविले होते. त्यानंतर कर्ज मंजुरी प्रक्रिया, तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी एक कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.





