Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा
Pune Crime: महापालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासनिक अधिकारी शंकर मांडवे यांची फिर्याद; ६२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण.

Pune Crime – सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमार्फत चालविण्यात येणारी सिंहगड सिटी स्कूल शासकीय परवानगी न घेता मंजूर ठिकाणाहून अन्यत्र स्थलांतरित केल्याचा प्रकार समोर आला आहे, तसेच पुणे महापालिकेने नवीन प्रवेश न देण्याचे आदेश दिले असतानाही शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पहिलीच्या वर्गात ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांत संस्थेचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले (५२) आणि सचिव सुनंदा मारुती नवले (५०) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुणे महापालिकेच्या कोंढवा- उंड्री क्षेत्रीय कार्यालयातील शिक्षण विभागाचे सहायक प्रशासनिक अधिकारी शंकर रामचंद्र मांडवे (५३) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कोंढवा बुद्रुक येथे सिंहगड सिटी स्कूल चालविण्यात येते. या शाळेचे मंजूर ठिकाण सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती.
त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेला पत्र पाठविले होते. शाळा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक शासकीय परवानगी घेण्यात आलेली नसल्याने शाळेत नवीन प्रवेश देऊ नयेत, तसेच शाळा मंजूर करण्यात आलेल्या मूळ ठिकाणीच चालवावी, असे स्पष्ट निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले होते. मात्र, संस्थेने महापालिकेच्या आदेशाचे पालन न करता शाळेचे स्थलांतरित ठिकाणीच कामकाज सुरू ठेवले.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पहिलीच्या वर्गात तब्बल ६२ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. शाळेच्या स्थलांतरास शासकीय मान्यता नसल्याची, तसेच नवीन प्रवेश न देण्याचे महापालिकेचे आदेश असल्याची माहिती पालकांना देण्यात आली नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.





