Katraj Kondhwa Road: समृद्धी महामार्ग तयार झाला, पण कात्रज-कोंढवा रस्ता कधी होणार? ९ वर्षांच्या विलंबावर नगरसेवक आक्रमक
Katraj Kondhwa Road: भूसंपादन, अतिक्रमणे आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे शहरात अपघातांचे सत्र; महापौरांनी तातडीने प्रत्यक्ष कामांची मुदत जाहीर करण्याचे दिले आदेश.

Katraj Kondhwa Road – कात्रज-कोंढवा या अवघ्या ४ कि. मी. लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम नऊ वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यानंतर सुरू झालेल्या समृध्दी महामार्गाचे काम संपून वाहतुकही सुरू झाली, तरीही या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. या रस्त्यावर आतापर्यंत २१ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे, आणखी किती जीव गेल्यावर रस्ता पूर्ण होणार, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्यसभेत केला.
कात्रज-कोंढवा रस्त्याप्रमाणेच शहरातील अनेक भागातील डीपी रस्ते प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अर्धवट असून त्या रस्त्यांवरही अपघात होत असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत शहरातील रस्ता रुंदीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर प्रशासनाला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही.
कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत झालेल्या चर्चेत ५० पेक्षा अधिक नगरसेवकांनी आपली मतं मांडत आपल्या भागातील अर्धवट रस्ते, किरकोळ भूसंपादन आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते नितीन गावडे, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, अरविंद शिंदे, विरोधीपक्ष नेते निलेश निकम,
नगरसेवक काका चव्हाण यांनीही प्रशासनाच्या कारभारावर टिका केली. भूसंपदानासाठी शेकडो कोटींचा निधी दिलेला असतानाही काम होत नाही. ठेकेदार चूकीच्या पद्धतीने काम करतात, त्यांना साधी नोटीसही बाजावली जात नाही, पुणेकरांचे जीव जात असताना प्रशासन जागे कधी होणार, असा सवाल केला. तर, सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही आयुक्तांनी तातडीने जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी,
अशी मागणी केली. मिसिंग लिंकचे रस्ते पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा सूचनाही केल्या. महापौर मंजूषा नागपूरे यांनीही प्रशासकीय कामांच्या दिरंगाईवरून नाराजी व्यक्त केली. तसेच, नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता केवळ कागदावर माहिती न देता कामे कधी होतील हे जाहीर करावे अशा सूचना केल्या.
“कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत ५० मीटर रुंद करून पूर्ण करण्यात येईल, सध्या, १४ मीटर रुंद असलेल्या या रस्त्यावर दररोज दोन लाखांहून अधिक वाहनांची वर्दळ आहे. ८४ मीटरचा डीपीतील रस्ता रद्द केलेला नसून, पहिल्या टप्प्यात ५० मीटरचा रस्ता पूर्ण केल्यानंतर पुढील दीड-दोन वर्षांत उर्वरित रुंदीकरण करण्यात येईल.”
– नवल किशोर राम, महापालिका आयुक्त






