pune : कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी
Pune:

पुणे – दोन दिवसांपासून पाणीकपात सुरू झाली असून, नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारींना सुरूवात झाली आहे. मध्यवर्ती भागातील पेठांमधून सर्वाधिक तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे येत आहेत.
महापालिकेकडून ५० टक्के शहरात सम आणि उर्वरीत ५० टक्के भागात विषम तारखेला पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी पहिला दिवस असल्याने तक्रारी फारशा आल्या नाहीत, मंगळवारी पेठांमधून सर्वाधिक तक्रारी आल्या. भवानी पेठ, नाना पेठ या भागातून नागरिकांनी कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी केल्या.
वारज्यातूनही अशाच तक्रारी आल्याचे, पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. जेथून तक्रारी आल्या आहेत, तेथे वेळ वाढवून दिल्याचे जगताप यांनी नमूद केले.
वाॅशिंग सेंटर्स, बांधकाम आणि पाण्याचा अनावश्यक वापर जेथे होतो, तेथे पथकाद्वारे बुधवारपासून पाहणी करण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर जागेवर दंड आकारण्यात येणार असल्याचे, जगताप यांनी सांगितले.





