Dr. D. Y. Patil: डॉ. डी. वाय. पाटील ः शिक्षणातील दीपस्तंभ!
Dr. D. Y. Patil:

Dr. D. Y. Patil: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे, अशा भावना पुण्यातील शिक्षण क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली.
डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणयोगीच नव्हे, तर एमआयटी संस्थेचे आधारस्तंभ आणि माझे ज्येष्ठ बंधुतुल्य मार्गदर्शक होते. त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून बहुजन समाजातील लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले. शिक्षण, आरोग्य, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील या दूरदर्शी, दीपस्तंभासारख्या व्यक्तिमत्त्वाचा एक अध्याय काळाच्या पडद्याआड झाला.
– डॉ. विश्वनाथ कराड,
संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील (दादा) यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी, समाजहितैषी नेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास शिक्षण, समाजसेवा आणि लोककल्याणासाठी अखंड समर्पित राहिला. स्व. पतंगराव कदम यांच्यासोबत सार्वजनिक जीवनात त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध, शिक्षण क्षेत्राच्या उभारणीसाठीची समान तळमळ आजही प्रेरणादायी आहे.
– आमदार डॉ. विश्वजीत कदम
कार्यवाह भारती विद्यापीठ, प्र. कुलगुरू भारती विद्यापीठ .
डाॅ. पाटील यांचे निधनाने शिक्षणातील एक पर्व संपल्यासारखे आहे. त्यांनी नामांकित व दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. माझे वडील शां. ब. मुजुमदार आणि पाटील हे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. त्यांचे निधन शिक्षण क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने देशातील एक मोठे शिक्षणतज्ज्ञ आपण गमावले आहे.
डाॅ. विद्या येरवडेकर,
कुलपती, सिंबायाेसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
सर्वांना दादा म्हणून प्रिय असलेले डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे स्वरूप बदलून टाकले. डॉ. विश्वनाथ कराड, दिवंगत डॉ. कमलकिशोर कदम, दिवंगत डॉ. पतंगराव कदम आणि इतर दूरदर्शी नेत्यांसोबत त्यांनी खासगी व्यावसायिक शिक्षणाचे युग घडविले. शैक्षणिक क्षेत्रापलीकडे आमच्या कुटुंबांमध्ये अनेक दशकांपासून स्नेह, परस्पर आदर आणि मैत्रीचे नाते आहे. डॉ. पाटील आणि माझे वडील डॉ. विश्वनाथ कराड यांचे शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी हे एकसारखे स्वप्न होते.
डॉ. राहुल कराड,
कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
शिक्षण क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण व शहरी भागातील लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देण्यात आधुनिक शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कोल्हापूरच्या भूमीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास, त्यांनी स्थापन केलेल्या नामांकित शिक्षण संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
राजेश पांडे,
सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश





