pune : पुढील आठवाड्यात थंडीचा जोर वाढणार

पुणे – शहरातील थंडीचा कडाका कमी झाल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान १४ ते १५ अंशाच्या पुढे गेले आहे. मात्र, पहाटे धुक्यांची चादर आणि रात्री हलकीसी थंडी जाणवत आहे. विशेषत: डोंगरभाग आणि धरणक्षेत्र परिसरात थंडी चांगलीच जाणवत आहे. पुढील आठवाड्यात थंडीचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात आठ ते नऊ अंशाने वाढ झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला. ६ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आज १५ अंशाच्या पुढे नोंदविले गेले आहे. परिणामी दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.
जिल्ह्यातील काही भागात किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस नोंदविले असून, शहर परिसरात किमान तापमान २० अंशाच्या पुढे नोंदविले. दरम्यान, शहरात पुढील दोन ते तीन दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहील.





