Pune CNG Shortage: पुण्यात सीएनजीचा तुटवडा! पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; नागरिक त्रस्त
Pune CNG Shortage: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सीएनजीचा प्रश्न गंभीर; गॅस भरण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहण्याची वेळ.

Pune CNG Shortage – शहरातील सीएनजीचा कमी दाब आणि अपुरा पुरवठा ही समस्या महिन्याभरापासून सुरू असून, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. परिणामी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत असून, काही सीएनजी पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. स्थानिक पातळीवर वारंवार प्रयत्न करूनही त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने,
अखेर पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेने (पीडीए) थेट केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे तातडीच्या भेटीची मागणी केली आहे. या समस्येकडे केंद्राने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. मागील महिन्याभरापासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सीएनजी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडे (एमएनजीएल) असोसिएशनने वारंवार लेखी निवेदने दिली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठकाही घेतल्या. इतकेच नव्हे, तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडे (पीएनजीआरबी) अनेकदा हा प्रश्न मांडण्यात आला. मात्र, वाहनचालक आणि सीएनजी पंपचालकांना अद्याप कोणताही ठोस दिलासा मिळालेला नाही.
असोसिएशनने नुकतेच एमएनजीएल प्रशासनाला पत्र पाठवून तातडीच्या उपाययोजना आणि निश्चित कालमर्यादेसह कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) सादर करण्याची मागणी केली होती. मात्र, या पत्राला प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे पंपचालकांमध्ये आणि सामान्य वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
सध्या सीएनजीचा दाब अत्यंत कमी असल्याने वाहनांमध्ये गॅस भरण्यास प्रचंड वेळ लागत आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि वैयक्तिक वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. स्थानिक स्तरावर हा प्रश्न सुटत नसल्याने, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मध्यस्थीनेच हा प्रश्न सुटेल, अशी आशा असोसिएशनने व्यक्त केली आहे.





