CNG Shortage: १ जुलैपासून सीएनजी बंद होणार? हिंजवडी आयटी नगरीत एका अफवेमुळे उडाला हाहाकार
CNG Shortage: हिंजवडी आणि मावळ परिसरातील पंपांवर गेल्या महिनाभरापासून सीएनजीचा विस्कळीत पुरवठा; १ जुलैच्या अफवेमुळे पंपांवर प्रचंड गर्दी.

CNG Shortage – आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून सीएनजीच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मारुंजी, नेरे, कासारसाई, जांबे तसेच मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांना सीएनजीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. हिंजवडी-कासारसाई मार्गावरील राजमुद्रा पेट्रोलियम आणि जाधव पेट्रोलियम या पंपांवर गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन सीएनजीची सुविधा उपलब्ध होती.
त्यामुळे परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय झाली होती. मात्र, मागील महिन्याभरापासून या पंपांवर वारंवार ‘सीएनजी संपले आहे’ असे फलक झळकत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कासारसाई येथील शितोळे पेट्रोलियम येथे नुकतीच सीएनजी सुविधा सुरू करण्यात आली असली तरी ती ऑफलाइन पद्धतीने सुरू असल्याने येथेही वारंवार सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे.
परिणामी, अनेक वाहनचालकांना वाकड किंवा हिंजवडीतील इतर पंपांवर जावे लागत असून, त्यात वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत आहे. अनेकदा पंपांवर कमी दाबाने सीएनजी मिळत असल्यानेही वाहनधारकांचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. यातच १ जुलैपासून सीएनजी पंप बंद होणार असल्याची अफवा परिसरात वेगाने पसरत आहे. या अफवेमुळे अनेक नागरिक घाईघाईने सीएनजी भरण्यासाठी पंपांवर गर्दी करताना दिसत आहेत.
त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या सीएनजी पुरवठ्यावर आणखी ताण निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित पेट्रोलियम कंपन्यांनी सीएनजीचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, ऑनलाइन सेवा पूर्ववत सुरू करावी, पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा तसेच अफवांबाबत स्पष्ट अधिकृत भूमिका जाहीर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली आहे.





