PMC News: महापालिकेचा आकृतीबंध बदलणार! २३ गावांच्या समावेशानंतर प्रशासनाची प्रक्रिया सुरू
PMC News: २०१४ नंतर पहिल्यांदाच आकृतीबंधात सुधारणा; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमुळे वाढलेल्या ताणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न.

PMC News – पुणे महापालिकेच्या वाढलेल्या कार्यक्षेत्रानुसार प्रशासनाचा आकृतीबंध (स्टाफिंग पॅटर्न) बदलण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. महापालिका हद्दीत २३ ग्रामपंचायतींचा समावेश झाल्यानंतर कार्यक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, अनेक विभागांमध्ये अद्याप जुन्याच आकृतीबंधानुसार कामकाज सुरू असल्याने प्रत्यक्ष गरज आणि मंजूर पदसंख्या यामध्ये तफावत निर्माण झाली आहे.
ही तफावत दूर करण्यासाठी सर्व विभागांकडून नव्याने माहिती मागविण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेतील प्रत्येक विभागाने मंजूर, भरलेली आणि रिक्त पदांची माहिती तसेच नवीन पदांची आवश्यकता असल्यास त्याचा प्रस्ताव १० दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या माहितीच्या आधारे महापालिकेचा सुधारित आकृतीबंध तयार करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
याबाबतचे परिपत्रक अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी जारी केले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाने मंजूर पदसंख्या, कार्यरत कर्मचारी, रिक्त पदे, आवश्यक पदसंख्या याची माहिती सादर करायची आहे. नवीन पदांची मागणी करताना संबंधित पदाचा वर्ग, आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी यांचाही तपशील नमूद करावा लागणार आहे.
या माहितीच्या आधारे महापालिकेच्या सर्व विभागांतील मनुष्यबळाचा सर्वंकष आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात येणार असून, भविष्यातील भरती, पदनिर्मिती आणि प्रशासनाच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
१२ वर्षांनंतर होणार बदल
महापालिकेच्या विद्यमान आकृतीबंधानुसार सुमारे २३ हजार पदांना मंजुरी आहे. त्यापैकी जवळपास ५ हजार पदे रिक्त असून, सुमारे १८ हजार पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत महापालिकेचे सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. पुढील दोन वर्षांतही जवळपास तेवढेच कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यातच, नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे महापालिकेची हद्द सुमारे ५१८ चौरस किलोमीटरपर्यंत वाढली आहे.
परिणामी, वाढलेल्या क्षेत्रात प्रशासकीय सेवा पुरविताना महापालिकेवर अतिरिक्त ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आकृतीबंधात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महापालिकेने २०१४ मध्ये सुधारित आकृतीबंध तयार करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी महापालिकेच्या आकृतीबंधात मोठे बदल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.






