Market Yard, Pune | दुबार विक्रीविरोधात बाजार समितीची आक्रमक भूमिका, दुसऱ्या दिवशीही कारवाईचा बडगा सुरूच…

पुणे :- मार्केट यार्डात दुबार भाजी विक्री विरोधात बाजार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसऱ्या दिवशी कारवाई करत ७ जणांकडून १६०३ जुडी पालेभाज्या जप्त केल्या. जप्त केलेल्या भाज्यांची विक्री करून त्यातून बाजार समितीला १० हजार ३४४ रुपये मिळाले. जप्त केलेल्या मालामध्ये ७२ जुडी कोथिंबिर, ३० जुडी कांदापात, १६५ जुडी पालक, १९६ जुडी चुका, ७०० जुडी आळू आणि ४४० जुडी पुदीनाचा समावेश आहे.
कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांचा आदेश, फळ-भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्या सुचनेनुसार गटप्रमुख नितीन चौरे, दादासाहेब वरघडे, दीपक धोपटे आणि संतोष कुंभारकर यांनी कारवाई केली.
मार्केट यार्डात कोथिंबिरीची दुबार विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. यामध्ये घाऊक बाजारात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कमी भावाने खरेदी करण्यात येत. हाच माल किरकोळ विक्रेते खरेदी करून महाग विकत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. तर ग्राहकांना खिशाला मात्र मोठी झळ बसत आहे.
Pune News : मार्केट यार्डात कोथिंबिरीची दुबार विक्री करणाऱ्यांवर कारवाई; ३३५ जुडी माल जप्त
कोथिंबिरीचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी कारवाई करत कोथिंबिरीच्या ३३५ जुडी जप्त केल्या होत्या. तर आज दुसऱ्या दिवशी १६०३ जुडी जप्त करण्यात आल्या. कोथिंबिरीबरोबरच इतर पालेभाज्यांची ही दुबार विक्री झाल्याचे दिसून येत आहे.





