Talegaon Dabhade : तळेगाव शहरात (Talegaon Dabhade) जनगणनेच्या कामाला वेगाने सुरुवात झाली असून या कामासाठी प्रशिक्षित २१५ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाच्या जनगणना कार्यालयामार्फत ही मोहीम (Talegaon Dabhade) राबविण्यात येत असून चार्ज ऑफिसर तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, जनगणना प्रमुख कल्याणी लाडे व सहाय्यक संदीप सोनवणे यांनी संपूर्ण शहराच्या जनगणनेचे नियोजन केले आहे. नगर परिषद क्षेत्रात १४ प्रभाग असून प्रत्येक प्रगणकास २०० घरांची जनगणना करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक सहा प्रगणकांमागे एका परिवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १६ मेपासून या जनगणनेस प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या कडक उन्हातही प्रगणक नागरिकांच्या घरी जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व कल्याणी लाडे यांनी केले आहे. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. – संतोष दाभाडे-पाटील, नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे