Pune Cantonment Assembly Election 2024 | झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचावणार – रमेश बागवे

पुणे :- झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचावणे, हा माझ्या जीवनाचा ध्यास आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासीयास त्याच जागी साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे मोफत घर देण्यास मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी रविवारी दिले. बागवे यांच्या प्रचारासाठी काशेवाडी आणि परिसरात निघालेल्या पदयात्रेचे रविवारी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
माजी नगरसेवक अविनाश बागवे, रफीक शेख, पल्लवी जावळे, उत्तमराव भुजबळ, जावेद खान, जुबेर शेख, कनव चव्हाण, संगीता दामजी, सुरेखा खंडाळे, उस्मान तांबोळी, भीमराव पाटोळे, पप्पू जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यापूर्वी नगरसेवक, आमदार आणि मंत्री असताना झोपडपट्टीवासीयांना वीज, पाणी, स्वच्छतागृहे या मूलभूत नागरी सुविधा मी उपलब्ध करून दिल्या होत्या. पुढील पाच वर्षांत झोपडपट्टीवासीयांना हक्काची पक्की घरे, आरोग्य, शिक्षण, पाणी या मूलभूत सुविधांसह रोजगार देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन बागवे यांनी दिले.
तरुणांना आणि महिलांना रोजगार देण्यासाठी, तसेच खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फुले- शाहू- आंबेडकर, मौलाना आझाद, अण्णा भाऊ साठे, लहुजी वस्ताद यांचे विचार रुजवून जातीय व धार्मिक सलोखा जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचेही बागवे या वेळी म्हणाले.





