पुणे : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इतर उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार आज विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
रिपब्लिकन युवा मोर्चा व महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवयुग बँक्वेट हॉल या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वांनी निळे फेटे परिधान केले होते. रमेश बागवे यांनादेखील निळा फेटा परिधान करून सन्मान करण्यात आला.
सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयदेव गायकवाड यांनी ” जात्यांध शक्तीला पराभूत करण्यासाठी बागवे यांना सर्व ताकतीने निवडून देण्याचे आवाहन केले. तर उमेदवार निवडून आणणे, भाजपाचा पराभव करणे हाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे ज्येष्ठ नेते अविनाश साळवे यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रशेखर जावळे ,रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष अशोक जगताप ,मेळाव्याचे संयोजक राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे, अनिल हतागळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रिपाइंचे आनंद कांबळे, दीपक ओव्हाळ, विठ्ठल गायकवाड, अक्षय कांबळे यांच्यासह आंबेडकरी संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबेडकरी जनतेचे जीवनमान उंचावणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे दिलेले अधिकारांचे संरक्षण करणे हे माझे जीवनध्येय आहे.
– रमेश बागवे ( काॅग्रेस, महाविकास आघाडी उमेदवार)