पुणे – पुणे शहराच्या वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करणारा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यात ‘भाईचा बड्डे वाजले बारा’ हे गाणं आणि गुन्हेगारी विश्वातील वाढदिवसांचे दृष्य विशेष गाजले होते. वास्तविक आयुष्यातही अशाच धाटणीची एक घटना शनिवारी मध्यरात्री पुण्यातील विमाननगर परिसरात घडली. दरम्यान याप्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर विमाननगर पोलिसांनी बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी हरिप्रसाद पुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार आकाश कंचिले, निखील कांबळे, फिरोज शेख, सोहेल कनुल, अखलाख शेख, वनराज जाधव, टक्या मिरे, राहुल घाडेग, साहिल कांबळे, आतिफ शेख तसेच इमारतीचे सिक्युरिटी मॅनेजर विजय अंबुरे आणि ईश्वर भोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगरमधील दत्त मंदिर चौकात असलेल्या स्कायमॅम्स इमारतीतील एका पबच्या पार्किंगमध्ये शंभरहून अधिक तरुणांनी मध्यरात्री मोठ्या थाटात एका ‘भाई’चा वाढदिवस साजरा केला. ही पार्टी फक्त एक साधा वाढदिवस नव्हता, तर पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील अनेक चर्चित चेहऱ्यांची उपस्थिती होती. यामुळे ती पोलीस यंत्रणेच्याही दृष्टीने धोक्याची घंटा ठरली आहे. पार्टीचं आयोजन विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने केलं होतं. त्याच्यावर सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे याच परिसरात त्याने यापूर्वी पोलिसांशी अरेरावी देखील केली होती. या पार्टीमध्ये ‘ मोक्का’ अंतर्गत नुकताच कारावासातून मुक्त झालेला आकाश कंचिले आणि त्याची टोळीही हजर होती. वाढदिवसाचा मुख्य ‘हीरो’ होता निखिल कांबळे टोळीचा म्होरक्या, ज्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून सुटून बाहेर आला आहे. यातील गुन्हा दाखल असलेल्या दहा आरोपींनी दहशत माजविण्याच्या दुष्टीने जमा करुन. हातात लाठ्या, काठ्या आणि धारदार शस्त्रे जवळ बाळगल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.