Pune: अतिक्रमण निरीक्षकांची मक्तेदारी मोडीत

पुणे – शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. असे असताना अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या होत नसल्याने त्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याने ही कारवाई प्रभावीपणे होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे अतिक्रमण विभागातील ११२ कर्मचाऱ्यांची प्रत्येक तीन महिन्यांनी बदली केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
अतिक्रमण विभागात अपुरे कर्मचारी असल्याचे कारण देत अनेक कर्मऱ्यांच्या बदल्या केल्या जात नसल्याने त्यांचे हितसंबध निर्माण झाले आहेत, तसेच अनेक कर्मचाऱ्यांबाबत महापालिकेकडे तक्रारीही प्राप्त झालेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रभावीपणे अतिक्रमण कारवाई व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेने शहरातील ४५ रस्ते नो हाॅकर्स झोन म्हणून घोषित केले आहेत. मात्र, या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. वाहतूक पोलिसांनीही महापालिका आयुक्तांकडे अनेकदा अतिक्रमणांच्या तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे.
११२ कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विभागाकडे ९६ सहायक निरीक्षक असून, १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी ११ , तर परिमंडळांसाठी ३ विभागीय निरीक्षक आहेत. दोन अतिक्रमण अधिकारी आहेत. तीन महिन्यांच्या बदल्यांमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी अतिक्रमण विभागात कमी कर्मचारी असल्याचे सांगत तीन ते पाच वर्षांनी त्यांच्या बदल्या होत होत्या.
मात्र, राजकीय दबाव येताच पुन्हा या बदल्या रद्द करून अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ठिय्या मांडून होते. मात्र, या नवीन धोरणामुळे अतिक्रमण निरीक्षकांची साखळी मोडून काढण्यास मदत होणार असून, अतिक्रमण कारवाई अधिक प्रभावीपणे होणार आहे.
“अतिक्रमण विभागात या पुढे प्रत्येक तीन महिन्यांनी निरिक्षकांच्या बदल्या केल्या जातील, या बदल्या आॅनलाईन पध्दतीने केल्या जातील. त्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून मान्यता मिळताच त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल.”- सोमनाथ बनकर ( उपायुक्त, अतिक्रमण विभाग)





