Pune Airport: विमानाने पूर्ण वेग घेतला अन् अचानक…; पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली…नेमकं काय घडलं?
Pune Airport: अचानक लागलेल्या आपत्कालीन ब्रेकमुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; तासभर तपासणी केल्यानंतर विमानाचे जयपूरसाठी सुरक्षित उड्डाण.

Pune Airport – लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असलेल्या पुणे-जयपूर विमानाच्या समोर अचानक कुत्रा आल्याने, वैमानिकाने तातडीने आणीबाणीचे ब्रेक लावून विमान थांबवले आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विमानतळावरील भटक्या कुत्र्यांचा वावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्याहून जयपूरसाठी जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान उड्डाण करणार होते. सर्व प्रवासी बसल्यानंतर विमानाने धावपट्टीवरून पूर्ण वेग घेतला होता. त्याचवेळी धावपट्टीवर एक कुत्रा धावत असल्याची माहिती एटीसीने वैमानिकाला दिली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत तातडीने रिजेक्टेड टेकऑफ करून विमानाचे उड्डाण ऐनवेळी रद्द केले. अचानक लागलेल्या या आपत्कालीन ब्रेकमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर वैमानिकाने सुरक्षेचा उपाय म्हणून उड्डाण थांबवल्याची घोषणा केली. विमान टर्मिनलकडे परत नेण्यात आले आणि तपासणीनंतर एक तासानंतर विमानाने जयपूरसाठी सुरक्षित उड्डाण केले. पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर प्राणी-पक्ष्यांचा वावर वाढल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. गेल्या जूनमध्ये कुत्र्यामुळे विमानाला हवेत घिरट्या माराव्या लागल्या, तर काही महिन्यांपूर्वी दिल्लीहून येणाऱ्या विमानाला पक्षी धडकला होता. नुकताच या परिसरात बिबट्याही दिसला होता. प्रशासनाने कुंपण दुरुस्ती व गस्त वाढवल्याचा दावा केला असला, तरी आजच्या घटनेने हे सुरक्षा उपाय अपुरे आणि कुचकामी असल्याचे पुन्हा उघड केले आहे.





