Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळावरील कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंना डावललं?; महायुतीत नाराजीचा सूर, फडणवीस म्हणाले…
Eknath Shinde : मात्र, नगरविकास विभागाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न मिळाल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिंदे गटात तीव्र नाराजी पसरली असून याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सिडको आणि अदानी एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र, नगरविकास विभागाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न मिळाल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची उभारणी सिडकोमार्फत करण्यात आली असून सिडको हा विभाग थेट नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे स्वतः नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना या महत्त्वाच्या कार्यक्रमातून दूर ठेवण्यात आल्याने शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली.
काल (9 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि इतर मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री कार्यालयावर आमचा आक्षेप नाही, मात्र शिंदे यांना डावलण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रतिक्रिया देत सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी आधीच दिले आहेत. अदानी समूह आणि सिडकोला कारणे दाखवा नोटीस बजावण्यासही सांगितले आहे. मी स्वतः माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली.” दरम्यान, या घटनेमुळे महायुतीतील समन्वय आणि अंतर्गत नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम 6 जून रोजी पार पडला. हा शासकीय कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार) यांना निमंत्रण न दिल्याने महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला.
हेही वाचा : Actor Jeevan : आई-वडिलांचं छत्र हरपलं, घरही सोडलं; संघर्षातून घडला हिंदी चित्रपटसृष्टीचा दिग्गज खलनायक






