पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाईनंतर फरार झालेल्या गुंडाला आंबेगाव पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली. गेले दोन वर्ष गुंड पोलिसांना गुंगारा देत होता. नवाज निसार सय्यद (वय २३, रा. संतोषनगर, कात्रज, मूळ रा. मुसा चौक, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सय्यद याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी २०२३ मध्ये ‘मकोका’ कारवाई केली हाेती. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर सय्यद पसार झाला होता. सय्यद छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी चेतन गोरे, हनुमंत मासाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सय्यद याला अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे यांनी ही कामगिरी केली.